Wednesday, July 27, 2016

दो नैना एक कहानी ....१९८३ मध्ये आला होता 'मासुम'. शेखर कपूरने दिग्दर्शित केलेला पहिलाच पण अप्रतिम सिनेमा. मी तेंव्हा किशोरवयीन होतो. माझ्या आईवडिलांसमवेत सोलापुरातील भागवत छायामंदिरात हा सिनेमा पाहिला होता. आता तिथे निर्जीव मल्टीप्लेक्स आहे, त्यातल्या बेचव कॉर्नप्लेक्ससारखेच.....
हा सिनेमा पाहताना एकदोन प्रसंगाच्या वेळेस शेजारी बसलेल्या आईच्या कुशीत तोंड लपवून रडल्याचे आठवतेय..त्यातलाच एक प्रसंग म्हणजे 'दो नैना एक कहानी' ह्या गाण्याचा हे मात्र नक्की...

बदलत्या काळानुसार अनेक गाणी आली आणि गेली, काही विस्मृतीत गेली. पुर्वी रेडिओ नित्य ऐकायचो तेंव्हा अनेक चांगली गाणी सतत कानी येत राहायची..काळ पुढे जात राहिला, मनोरंजनाची साधने बदलली आणि रेडीओ लुप्त झाला...मायेची माणसे दूर देशी देवाघरी गेली आणि जगणे अधिक कृत्रिम होत गेले. यांत्रिक जीवनाचा भाग म्हणून मनोरंजन राहिले, त्यातला जिवंत रसरशीतपणा कधी संपला काही कळालेच नाही...

मागच्या वर्षी शाळेतल्या मित्रांचे एक छोटेसे संमेलन माझ्या जिवलग मित्राने Rajeshने भरवले होते, त्यावेळी पिरंगुटला जाताना कारमध्ये हे गाणे खूप वर्षाच्या अंतराने कानावर पडले आणि स्मृतींचे एकच मोहोळ उठले.... डोळे कधी ओले झाले काही कळलेच नाही...तेंव्हापासून यावर लिहायचे डोक्यात घोळत होते मात्र गुलजारजींनी लिहिलेल्या या गाण्याबद्दल काही लिहावे इतकी माझी योग्यता नाही हे डोक्यात पक्के होते... पण या अवीट गोडीच्या गाण्यावरील प्रेमापोटी यावर लिहिण्याचा मोह अनावर झाला म्हणून लिहितोय.

'मासूम' गाजला, त्यातल्या कथेमुळे, नसिरुद्दीन, शबाना, उर्मिला आणि जुगलच्या अभिनयामुळे ! यातील गीतांनी ह्या चित्रपटाचे सोने केले. एकापेक्षा एक सुरेल अन अर्थपूर्ण गाणी यात होती. आरडीचे संगीत, गुलजारजींची गाणी अन एकापेक्षा एक महान गायकांची गायकी असा अमृतसंगीताचा योग यात होता. यातले 'तुझसे नाराज नही' हे गाणे जास्त लोकप्रिय झाले पण मला भावते ते 'दो नैना एक कहानी' हे गाणे !

नसिरुद्दीन आणि शबानाचा दृष्ट लागण्यासारखा सुखी संसार. त्यात नसिरुद्दीन आणि सुप्रिया पाठकचे प्रेमप्रकरण! आणि मग जुगलचे आगमन. सुप्रिया पाठकचा दुर्दैवी मृत्यू. आणि मग आपलं पित्याचं कर्तव्य निभावण्यासाठी नसीरने जुगलला घरी आणल्यामुळे निर्माण झालेलं वादळ. आकाशपाताळ एक करण्याचा शबानाला पूर्णपणे हक्क! तिची प्रतिक्रिया संयमी! मनात विचारांचे आणि दुःखाचे वादळ असूनसुद्धा! आपली कुटुंबातील दैनंदिन कर्तव्य यांत्रिकपणे पार पाडण्याचे काम ती पार पाडत असते. नसीरची तर अजूनही जास्त कुचंबणा. शबाना आपल्या दोन मुलींवर प्रेमाचा वर्षाव करीत असताना जुगल एका कोपऱ्यात राहून बाह्यस्वरूपी अलिप्तपणे आपलं जीवन जगत असतो. दिवसा खेळण्यात बागडण्यात त्याचा वेळ जातो परंतु त्याची रात्र मोठी कठीण असते. कारण सांज भल्या भल्या माणसांना आठवणीच्या सयीत विरघळवते. सांजेला जोडून येणारी रात्र माणसाला भावुक बनविते आणि आठवणींचा कल्लोळ माणसाच्या मनात निर्माण करते. एके रात्री शबाना आपल्या मुलींसाठी अंगाईगीत गात पुढे गायलेलं 'दो नैंना ..' हे गीत जुगलच्या कानी पडते. तो आपल्या अभ्यासिकेतून बाहेर येतो. हे गाणे अर्थातच त्याच्या मनात त्याच्या आईच्या आठवणी सचेत करते. चित्रपटात हे गीत गातेय शबाना पण ते जुगलच्या मनातील भावनांच्या तरंगांशी अधिक मिळते जुळते आहे.
 गुलजारजींनी कोणत्या अर्थाने व प्रयोजनाने हे गाणे लिहिले हे कळणे बुद्धीपलीकडचे आहे मात्र हे गाणे खूप काही सांगून जाते, सतत कानात रुंजी घालत राहते हे खरे.

'दो नैना और एक कहानीथोडा सा बादल, थोडा सा पानी और एक कहानी' या ओळी ऐकून जुगल बाहेर येतो आणि शबानाला तिच्या मुलींसाठी हे गाणे अंगाई म्हणून गाताना पाहतो. त्याचा जीव कासावीस होतो. 'थोडासा पानी' तर त्याच्या डोळ्यात केंव्हाच आलेय पण यातील जी 'एक कहानी' आहे, ती तिघांचीही वेगवेगळी आहे. शबानाचे दुःख वेगळे, नासिरची व्यथा अबोल शब्दातली तर जुगलचे वयच लहान अन दुखाचा डोंगर मोठा....

'छोटी सी दो झिलों में, वोह बहती रहती है
कोई सुने या ना सुने कहती रहती है,
कुछ लिख के और कुछ जुबानी.....'
 ह्या पंक्ती ऐकताना जुगलला त्याची आई आठवते, तिचे प्रेम आणि सहवासातले क्षण त्याच्या काळजातून डोळ्याच्या पारयात उतरतात. नसीर त्याच्या मागे येऊन उभा राहतो पण थिजलेल्या अपराधी माणसासारखा ! ही कहाणी 'दो झिलोमे बहती रहती है' अशीच आहे, तिला उसंत नाही ती कोणी ऐकण्या न ऐकण्याचा प्रश्नच नाही. ती फक्त ज्याच्या त्याच्या आठवणीत राहणार हेच त्याना सुचवायचे असेल...
'थोड़ी से हैं जानी हुई, थोड़ी सी नयी
जहा रुके आंसू, वही पुरी हो गयी
है तो नयी फीर भी हैं पुरानी...'

खरे तर अशा प्रसंगात अश्रू कधीच थाबत नाहीत म्हणूनच 'जहा रुके आसू, वही पुरी हो गयी !' असं अगदी जाणीवपुर्वक लिहिलंय. म्हटलं तर नवं म्हटलं तर जुनं थोडं ओळखीचे वाटणारं असं हे वेदनेचं, अश्रुंचं जगणं ! या वेळी पडद्यावर सुप्रिया आणि जुगल फ्लॅशबॅक मध्ये दिसतात. आईची चिता जळताना पाहिलेल्या जुगलचे अनाथ असणं इथं प्रेक्षकांच्या मनावर खोल बिंबतं....त्यामुळे जुगलची वेदना अधिक गहिरी होते.
'एक ख़त्म हो तो, दूसरी याद आ जाती है
होठों पे फिर भूली हुई, बात आ जाती है
दो नैनो की हैं यह कहानी ....'
शेवटच्या ओळी गाताना शबानाचे डोळे डबडबून गेलेले असतात. ती गात गात खिडकीपाशी येते तर आईच्या आठवणीने विव्हळ झालेला जुगल घराबाहेर लॉन मध्ये येतो आणि त्याच्या पाठीमागे चालत आलेला नसीर अधांतरी असल्यागत घराच्या दरवाजातच थबकतो. अंधारात उभा असलेला जुगल रडवेल्या चेहऱ्याने पाठमोरा होऊन शबानाकडे वळून बघतो, तर वरच्या मजल्याच्या खिडकीतली शबाना आता डोळ्यातून आलेले अश्रू ओघळतील इतक्यात मागे सरकते. आणि हतबध्द होऊन उभ्या असलेल्या नसीरवर छोटासा क्लोजअप घेऊन गाणे संपते...

 हे गाणे एकाच वेळेस तिघांचे दुःख शब्दबद्ध करते. आईच्या आठवणीने भावविभोर झालेला निरागस मुलगा, पतीने प्रतारणा केल्याचे दुःख न बोलता सहन करणारी एक स्त्री जी एक हळवी आईही आहे. तर एका बाजूला दुहेरी अपराधीपणाचे सल अनुभवणारा संयमी शांत पण हतबद्ध नवरा जो कर्तव्यसन्मुख पिताही आहे...

भावनांचे अनेक कंगोरे, तिन्ही पात्रांची घुसमट आणि वेदनेचे अचूक प्रकटन हा या गाण्याचा आत्मा आहे. हे गाणे ऐकताना 'गेले द्यायचे राहून' ही भावना अन कर्तव्य जे करायचे राहून गेले याचे एकत्रित स्मरण करून देते....काळाच्या पटलावर मोहरे होऊन जगताना आलेली यांत्रिकता अन वास्तविक जीवनात स्वीकाराव्या लागणारया तडजोडी सतत डोळ्यापुढे येत राहतात. अन अस्वस्थता वाढत जाते... 'एक ख़त्म हो तो, दूसरी याद आ जाती है, होठों पे फिर भूली हुई, बात आ जाती है, दो नैनो की हैं यह कहानी ....' या ओळीचे अर्थ फार खोलात घेऊन जातात, अगदी अंतर्मुख करतात..

हे गाणे मनावर अजब गारुड करून जाते, अशा एका हव्याहव्याशा वाटणारया दुःखाचा पुनर्प्रत्यय देत राहते. 'मासूम' पाहताना नकळत डोळ्याच्या कडा दरवेळेस ओले करून जाते...

या गाण्याला त्या वर्षीच्या उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.त्याला कारण म्हणजे गायिका आरती मुखर्जी ! विलक्षण आर्त व काहीसा कातर असा, पण मोकळा वाटणारा तलम आवाज हे या गायिकेचे वैशिष्ट्य गाण्याच्या प्रत्येक शब्दात जाणवत राहते. ह्या आवाजाची एक दर्दभरी मिठास या गाण्याला अजरामर करून गेलीय यात शंकाच नाही...पंचमजींच्या संगीतासाठी अन चालीसाठी तर शब्द नाहीत. शेखरकपूरने गाणे सजीव केलेय तर शबाना, जुगल अन नसीर हे तिघेही आपआपले पात्र जगलेत...

आजही कधीही कोठेही हे गाणे ऐकले की मन तल्लीनही होते अन वेदनेच्या स्मृतीवर आठवणींची हळुवार झुळूक अलगद फुंकर मारून जाते.

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment