Wednesday, July 20, 2016

महत्वाचे काय - जिवंत माणूस की मृत गाय ?


मृत गायीचे कातडे काढणाऱ्या माणसाची चामडी सोलून निघेपर्यंत त्याला मारणे याचे समर्थन करणे योग्य आहे का ?
ज्या तरुणांनी मृत गायीचे कातडे काढले, त्यांना पिढयानपिढया हे काम करायला कुणी भाग पाडले ?
मृत गायीच्या कातड्यात जर देव असेल तर हाडामासाच्या माणसात देव नसतो का?
मेलेली गाय महत्वाची का त्या गायीच्या कातड्यावर उदरनिर्वाह करणारे लोक  महत्वाचे ?
बरे, या ढोर समाजाच्या लोकांनी कातडीसाठी जनावरे ओढून नेली नसती तर मृत गुरांचे अवशेष सडून कुजून दुर्गंधी सुटून अनारोग्य पसरते, याची जबाबदारी कोण घेतली आहे का ?

कातड्यांचे हल्लाली व मुर्दाडी असे दोन प्रकार आहेत. मारलेल्या जनावरांच्या कातड्यांनां हल्लाली व मेलेल्या जनावरांच्या कातड्यांनां मुर्दाडी असें म्हणतात. यापैकीच्या कातड्याच्याच आपण विविध चीजवस्तू वापरतो.
ढोर हे कातडे काढतात आणि चर्मकार त्या कातड्याला कमावतात, गायींवर धार्मिक श्रद्धा असणारया लोकांसाठी हा व्यवसाय बंद झाला तर काय आर्थिक - सामाजिक, आरोग्यविषयक परिणाम होतील ?
गावोगावी मेलेली जनावरे ओढून नेण्याची कोणती यंत्रणा सरकारकडे आहे ?
जनावर ओढून त्याची कातडी काढून आणण्याचे अन तेच कातडे कमवण्याचे काम बंद केले तर चर्मोद्योगावर काय परिणाम होईल ?
आपण धार्मिक कार्यक्रमात जे ढोल मोठमोठ्याने बडवत असतो ते कुठल्या प्राण्याच्या कातड्यापासून बनवलेले असतात याची खरी, पक्की माहिती आपल्याला असते का ?
सरते शेवटीचा प्रश्न - मृत प्राणी महत्वाचा की जिंवंत माणूस महत्वाचा ?...
महत्वाचे काय - जिवंत माणूस की मृत गाय ?

या सर्व प्रश्नांवर विचार केल्यावर वाटते की गुजरातेत ऊना इथे मृत गायींच्या कातडे काढण्यामुळे दलित समाजातील चार तरुणांना अमानुष मारहाण झाली त्यामुळे तिथल्या दलित समाजात झालेला उद्रेक योग्यच वाटतो..
सत्ताधारी पक्षाने आणि प्रशासनाने यात वेळकाढूपणा करून आपली भूमिका आणि वैचारिकता याची चुणूक दाखवली, त्यामुळे हे आंदोलन आता जास्त चिघळले आहे !
सत्तेत मश्गुल असणाऱ्या लोकांना हा आत्यंतिक कडवा आणि पोकळ धर्मंवाद एक दिवशी अस्ताकडे घेऊन जाईल याची त्यांना जाणीव होणे आवश्यक आहे.

'सदा सर्वदा देव सन्नीध आहे कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे
सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ..'
रामदास स्वामींनी लिहिलेल्या या श्लोकानुसार 'देव सदा सर्वदा तुमच्या जवळ आहे. देव कुठे नाही? तो तर तुमच्यामध्येच आहे, तुमच्या हृद्यात आहे. सर्वत्र भरून राहिलेला आहे.'
माझे विचार अयोग्य असतील तर या श्लोकाचा अर्थ पाहता समर्थ रामदासस्वामी चुकलेच म्हणायचे ....
असो...

आपण कातड्यापासून बनवलेल्या अनेक वस्तू दैनंदिन जीवनात वापरतो त्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेतली तर विचार करणे जास्त सोपे जाईल.
"कातडे कमावण्याच्या एतद्देशीयपद्धती - खाटीक, ढोर, धेड, महार वगैरे लोक मेलेल्या जनावरांच्या अंगावरील कातडे काढतात. नंतर त्यावरील कचरा, मळ, वगैरे निघून जाण्याकरितां दोन दिवस ती पाण्यांत भिजत ठेवतात.  नंतर एक प्रकारचा दगड असतो,  त्यावर ते ठेवून मोगरीनें बडवितात. त्या योगानें कातड्यावर मांस, चरबी वगैरे द्रव्यें असल्यास तीं निघून जाऊन तें स्वच्छ होतें.  मग १० भाग चुना व ८० भाग पाणी यांच्या मिश्रणांत ते कातडे टाकून बारा किंवा पंधरा दिवस भिजत ठेवतात. तें पूर्ण भिजून फुगलें म्हणजे त्यावरील केंस निघूं लागतात. या मिश्रणांतून तें बाहेर काढल्यावर कोयत्यासारख्या बोंथट हत्यारानें त्यावरील केंस खरडून काढतात.  पुढें तें कबुतराच्या विष्ठेच्या पाण्यांत टाकलें म्हणजे चुन्याच्या योगानें त्यास आलेला फुगीरपणा नाहींसा होतो.  यानंतर तरवड किंवा बाभळीची साल यांच्या मिश्रणांत तें टाकतात. 
त्याची रीत अशी : - तरवडाची किंवा बाभळीची साल आणून ती ८ पट पाण्यांत एक रात्र भिजत घालतात. म्हणजे सालीतील रंगाचा अंश त्या पाण्यांत उतरतो.  किंवा साल पाण्यांत घालून विस्तवावर उकळवतात, म्हणजे तें पाणी उत्तम रंगदार होतें. या पाण्यांत कातडें भिजत ठेवले असतां तें कुजण्याची क्रिया बंद होते. या मिश्रणांतून कातडें बाहेर काढल्यानंतर सुकवतात व सुकल्यावर पुनः तें स्वच्छ पाण्यांत टाकतात. तें चांगलें भिजलें म्हणजे बाहेर काढून एका लांकडाच्या वाटोळ्या ठोकळ्यावर केंसाची बाजू खाली करून ठेवतात. मग सुरीसारखें एक मुठीचें हत्यार असतें, त्यानें तें कातडें खरडून साफ व आपणास पाहिजे इतकें पातळ करून घेतात. नंतर पुनः तें पाण्यांत टाकून गुळगुळीत वाटोळ्या दगडानें घोटले जाते, व मृदुत्व येण्याकरितां तूप व मेण एकत्र कढवून त्यावर सारवले जाते."

त्या कमावलेल्या कातड्यापासून आपण वेगवेगळ्या चीज वस्तू घेतो आणि आपल्या जीवनात वापरतो. अमुक एक कातडी वस्तू कुठल्या मृत वा जिवंत प्राण्याच्या कातड्यापासूनची आहे हे आपल्याला ठाऊक असते का ?
मग तेंव्हा गायीची आठवण येते का ?
आपला धर्म मृत पशूसाठी माणसे मारायला शिकवतो का ?
कर्मठ धर्मवादाने काय साध्य होणार आहे ?
मानवता मोठी की धर्म मोठा ?
इस्लामी समाज जेंव्हा आत्यंतिक कर्मठ अन कडवा होत गेला तेंव्हा त्या समाजातील समाज धुरिणांनी त्याला आळा घालण्याचे सक्षम प्रयत्न केले नाहीत, परिणाम जगापुढे आहेत. हिंदू धर्मातील अनाठायी कडवटपणावर राजकीय पक्ष आणि समाजधुरीण आपले मौन कधी सोडणार ? का आपण पण वेळ निघून गेल्यावर जागे होणार ?

सदर पोस्टवर प्रतिक्रिया देताना उथळ, भडक, जात धर्म विषयक अभद्र टिप्पणी करू नये. ज्यांना माझे विचार पटत नसतील त्यांनी मला ब्लॉक केल्यास हरकत नाही, पण पोस्टवर असभ्य, अश्लाघ्य भाषेत टिप्पणी करू नये.

- समीर गायकवाड.