Thursday, June 30, 2016

मैत्रीचे बुरुज ....


काल माझा जन्मदिवस होता....तसा मी अनोळखी व्यक्तींशी लवकर संवाद साधू शकत नाही....मला काही खंडीभर मित्रही नाहीत...जे आहेत ते जीवाभावाचे आहेत...अगदी शाळेच्या पहिल्या इयत्तेपासूनचे मैत्र अजूनही संवादी अंकुरात फुलताहेत...
परिचयाच्या व्यक्तींशी बोलताना मात्र मी थकत नाही, पण मूलतः बोलण्यापेक्षा लिहिण्याकडे माझा कल जास्त असल्याने गप्पाष्टकांची मैफल रोजरोज न होता अवचितच जुळून येते...रोजच्या दिनचर्येत इतकी वर्षे केवळ वाचन करण्यात गेली, मात्र मागील सहाएक महिन्यांपासूनसातत्याने विविध विषयांवर जमेल तसं पण मनाला भावणारं लिहिण्याचा प्रयत्न करतोय...त्यामुळे अलीकडील काळात केवळ लिखाणामुळे बरेच नवे मैत्र जोडले गेले, काही सोशल मिडियातून तर काही वाचन-लेखनाच्या चळवळीतून !

कालपर्यंत अनभिज्ञ असणाऱ्या अशा सर्वांनी, नव्या जुन्या मित्रांनी, परिचितांनी, स्नेहांकितांनी, आप्तजनांनी, शुभचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छा व आशीर्वादांनी काल मात्र मी अगदी सदगदित झालो....माझ्या मनाच्या विजनवासातील किल्ल्याला काल अक्षरशः उधाण आले होते, कालचा माझा दिवस शुभेच्छांच्या गारुडाने भारलेला दिवस होता...कुणी फोन करून तर काहींनी प्रत्यक्ष भेटून तर काहींनी मेसेजेस पाठवून तर कुणी सोशल मिडीयावरून मला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे माझ्या मनातले काहीसे चिरे सुटलेले, काहीसे ओसाड झाल्यागत वाटणारे उत्तुंग बुरुज काल नव्या चिरेबंदीने तरारून उठले... कामाच्या थकव्याचे खंदक मैत्रीच्या सदाफुली ताटव्याने भरून गेले अन माझ्या लेखणीला तोफांची ताकद तुम्हा सर्व सृजनांनी नव्याने बहाल केली...

आपल्याशा वाटणारया या मैत्रीच्या गडावर तुम्ही असेच येत रहा, स्नेहाचे शीतल वारे तिथे तुमचे स्वागत करतील, तिथले नगारखाने पुन्हा गजर करतील, तिथल्या पायरयाना शहारे येतील... प्रेमळ आपुलकीची तुमची पायधूळ एकदा या मैत्रीच्या गडावर अवश्य झाडा तिथल्या प्रत्येक चिरयात- दगडात- कणाकणात मी हसतमुखाने तुमच्या स्वागतासाठी सदैव हजर असेन...

माझ्यावर प्रेम करणारया, माझे अभिष्टचिंतन करणारया, मला आशीर्वाद देणारया तुम्हा सर्वांचे माझ्यावर हे एक ऋणच आहे...बस्स एक आर्जव आहे कधी काही चुकले, कुठे मर्यादा उल्लंघल्या तर मला आपल्या पदरात घ्या अन निसंकोचपणे चुका दाखवा....

पण तुम्ही असेच मला भेटत जा, तेव्हढीच वर्दळ बरी वाटते अन लिहायला, वाचायला, झुंझायला एक नवे बळ मिळते....

-तुमचा समीर..