Friday, June 10, 2016

उडता पंजाब आणि 'सव्वा रुपयाचे' सेन्सॉर बोर्ड....'उडता पंजाब' या चित्रपटाचा निर्माता अनुराग कश्यपने दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाची खरडपट्टी केली. "या चित्रपटात वस्तुस्थिती दाखवण्यात आली आहे. समाजात जे घडते त्यावर हा चित्रपट भाष्य करतो. समाजातील स्थिती दाखवलीच पाहिजे. यात सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. लोकांना चित्रपट, नाटके पाहू द्या व त्यांना मते बनवू द्या. हा चित्रपट कोणाला आवडेल तर कोणाला नाही. 
लोकांच्या निवडीवर आक्षेप घेणे चुकीचे आहे.

सेन्सॉर बोर्डाचे काम फक्त चित्रपटाच्या दर्जानुसार प्रमाणपत्र देण्याचे आहे. सेन्सॉर बोर्डाचे काम म्हणजे फक्त चित्रपटाला कात्री लावणे हे नव्हे." अशा शेलक्या शब्दात न्यायालयाने सुनावले. "शिवाय असे प्रकार करून अशा चित्रपटांना तुम्ही प्रसिद्धीच मिळवून देत आहात' असा आहेरही दिला. ग्रेंड मस्ती ३ सारख्या 'विचारप्रवण' सिनेमांना सहज प्रमाणपत्र देणाऱ्या सेन्सॉर बोर्डाने 'उडता पंजाब' प्रकरणी 'आ बैल मुझे मार' अशी आपली अवस्था करून घेतली आहे. त्याच बरोबर चित्रपटात कुत्र्याचे नाव जॅकी चेन ठेवल्याचे, तसेच 'जमिन बंजर तो औलाद कंजर' अशी अपमानास्पद भाषा वापरल्याचे नमूद केले गेले. तसेच 'उडता पंजाब' चित्रपटामुळे पंजाबची प्रतिमा मलीन होत आहे व देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होतो आहे' असे बिनबुडाचे आरोपदेखील सेन्सॉर बोर्डाने केले. आधी आधी ८९ दृश्ये कापण्याची सूचना करणारया बोर्डाने अखेर १३ दृश्ये कापण्याची सूचना केली. तेंव्हा मात्र न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाची बिन पाण्याने केली.

या चित्रपटाआधी सेन्सार बोर्डाने बॅंडिट क्वीन, देल्ही बेल्ही, गॅंग्स ऑफ वास्सेपूर अशा चित्रपटांना परवानगी दिल्याकडे अनुरागच्या वकिलांनी कोर्टाचे लक्ष वेधले.
त्यावर न्यायालय म्हणाले की, "आज जमाना बदलत आहे. आजची पिढी जगभरातील चित्रपट पाहत आहे. आपले चित्रपटही जगभरात पाहिले जात आहेत." पहलाज निहलानी यांच्याकडे अंगलीनिर्देश करताना कोर्टाने सुनावले की, '१९८० च्या काळात व आताच्या काळात खूप बदल झाला आहे. आजपर्यंत गोवा हे राज्य कित्येक चित्रपटांमध्ये वाईट पद्धतीने दाखवण्यात आले आहे. तेव्हा गोव्याची बदनामी होते म्हणून दखल का घेतली नाही ?'

या सर्व प्रकारामुळे एक झाले. चित्रपटविषयक सर्वंकष जाणीवा समृद्ध नसूनही अन चित्रपट क्षेत्रात मूल्यात्मक दृष्ट्या शून्य कामगिरी करूनही केवळ सद्य सरकारचे जोडे उचलून सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या पहलाज निहालानींनी दाखवून दिले की त्यांची झाकली मुठ लाखाची तर सोडा पण सव्वा रुपयाची देखील नाही.

आज न्यायालयानेच सेन्सॉर बोर्डाचे कान उपटले ते एका अर्थाने बरेच झाले कारण मागील काही दिवसापासून सोशल मिडीयावर अनुराग कश्यपला ' तू आता पाकिस्तानात जाऊन रहा' असा आपला आवडत्या पालुपदाचा सल्ला देणारे विचारवंत लोक पुन्हा कार्यरत झाले होते. त्याला थोडा तरी आळा बसेल. हे बुद्धिवंत लोक आणि 'महाज्ञानी' पहलाज निहलानी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखतील अशी माफक अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

याआधी देखील सेन्सॉर बोर्डाने बरीच हुशारी दाखवली आहे. विकास बहलच्या कंगना रानौट अभिनित 'क्वीन' चित्रपटात तिच्या हातात एका सीनमध्ये 'ब्रा' होती तेंव्हा सेन्सॉरने आपली अक्कलहुशारी पाजळत तिच्या हातातली 'ब्रा' ब्लर (धुरकट) करायला लावली होती. या शिवाय याच चित्रपटातील काही दृश्यात अंडरगारमेंटसच्या दृश्यांना ब्लर करायला लावले होते. मधुर भांडारकरच्या 'हिरोइन'मधलं करीनाचं धुम्रपानाचं दृश्य देखील कापलं होतं ! 
होमी अदजानियाच्या 'फाईंडिंग फेनी' या चित्रपटातील व्हर्जिन या शब्दाला सेन्सॉरने आक्षेप घेतला होता. १९९४ मध्ये गोविंदा करिष्माकपूरच्या एका गाण्याचे शब्द 'सेक्सी सेक्सी मुझे लोंग बोले' असे शब्द होते ते बदलून 'बेबी बेबी मुझे लोंग बोले' असे करायला लावले पण तोवर ऑडीओ टेप्सनी जो धुमाकूळ मूळ शब्दात घालायचा होता तो घालून झाला होता. 
सुपरहिट 'शोले'चा तर क्लायमेक्स सेन्सॉरने बदलायला भाग पाडले होते. 
राकेश ओमप्रकाश मेहराच्या 'रंग दे बसंती'च्या टायटल सॉंगमधून निहंग शीख घोडेस्वारी करतानाचा २० सेकंदाचा सीन वगळायला सांगितला होता.
तर 'ईश्कीया'मध्ये शहराचे नाव गोरखपूर होते यावरून सेन्सॉरने आक्षेप घेतला होता मात्र काही दिवसापूर्वी समलिंगी संबंधावरील 'अलीगड' या शहराच्या नावाने शीर्षक असणारया सिनेमालाच ग्रीन सिग्नल दिला होता ! 
'साहिब बिवी और गेंगस्टर' या तिग्मांशु धुलीयाच्या सिनेमातील रणदीप हुड्डा - माही गिलच्या सिनेमातील प्रणयदृश्यांना कात्री लावली होती. 
तर याच वेळी रणदीप हुड्डाच्या 'जिस्म २' मधील सनी लिओनि बरोबरच्या हॉट दृश्यांना परवानगी दिली होती. 
'शूट आऊट एट वडाला'तली हिंसक दृश्ये तशीच ठेवून त्यातील थातूर मातुर रोमान्स सीन्सला सेन्सॉरने कात्री लावली होती. 
'आजा नच ले' सिनेमातील मोची या शब्दावरून वाद झाल्यावर सेन्सॉरने लोटांगण घालून टायटल सॉंगमधील एक ओळच बदलून टाकली होती. 
पेरी नलीन यांच्या 'एंग्री इंडियन गॉडेसेस' मधलं 'मेरा इंडियन फिगर है' हे वाक्य सेन्सॉरला आक्षेपार्ह वाटलं होतं. 
विशाल भारद्वाजच्या 'कमीने' चित्रपटातील एका गाण्यात 'तेली' हा शब्द होता तर सेन्सॉरने गाण्यातला तो शब्द म्युट करायची कमाल केली होती. 
शाहरुखच्या 'बिल्लू बार्बर'चे नाव बदलून त्यातील बार्बर वगळायला फर्मावले होते, विशेष म्हणजे आजही हा सिनेमा लोकांच्या डोक्यात 'बिल्लू बार्बर' याच नावाने ध्यानात आहे. 
विशाल भारद्वाजच्याच 'हैदर'च्या एका सीनमध्ये अभिनेत्री तब्बूचा पूर्ण उघडया पाठीचा सीन कापायला लावला होता. 
तर त्याच वर्षातल्या सनी लिओनिच्या 'हेट स्टोरी २' मध्ये तिने दाखवायचे काही उरलेच नव्हते. 
नुकत्याच आलेल्या 'वीरप्पन' मध्ये राजीव गांधींच्या हत्येच्या अनुषंगाने एक वाक्य होते ते वाक्य वगळायला लावले, असं करताना तमिळ लोक नाराज होतील असं तकलादू कारण सेन्सॉरने पुढं केले होते. 
आशुतोष गोवारीकरच्या 'जोधा अकबर'वरून वाद उद्भवल्यावर सेन्सॉरने सिनेमाच्या सुरुवातीला एक खुलासा करायला आशुतोषला भाग पाडले होते.
हॉलीवुडच्या अनेक चित्रपटांना मन मानेल तशी सूट देणारया सेन्सॉरने कधी कधी अगदी छोट्या गोष्टींचा किस पाडल्याची अनंत उदाहरणे देता येतील. 
या सर्व उदाहरणावरून सेन्सॉरची धरसोडवृत्ती असल्याचे आणि सत्य - वास्तव लपवून लोकानुनय करण्याची भिकार सवय लागल्याचे स्पष्ट जाणवते. भविष्यात शिवछत्रपतींच्या जीवनावरील एखाद्या चित्रपटात सेन्सॉरने 'अफजलखान वधाच्या' दृश्यास कात्री लावली तर नवल वाटू नये.

- समीर गायकवाड.

आजच्या सुनावणीादरम्यान सेन्सॉर बोर्डाने कोलांटी उडी मारली. आपला चित्रपटावर आक्षेप नाही मात्र कंजर आणि इतर शब्द जे चित्रपटात वापरण्यात आले आहेत त्यावर आक्षेप असल्याचे सेन्सॉर बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment